किल्ल्यात न पोहोचलेला दगड : क्षमता आणि योगदान

"मार्केटिंग आम्हाला जमत नाही. चांगले प्रॉडक्ट बनवले तर ते विकले जातेच. Made in Japan एवढे पुरेसे आहे" 

असे मानणारे जपानी आजही आहेत. पण साकुराचे उदाहरण घ्या. एक साधे फूल ही जपानची ओळख आहे. नियोजनपूर्वक मोक्याच्या ठिकाणी साकुराची झाडे, वेगवेगळे कार्यक्रम, गोष्टी, गाणी आणि एकंदरीतच समाजामध्ये साकुराचे अस्तित्व. जगभर त्याचे प्रमोशन करून आज मार्च महिना आला की जपानला लाखो लोक (काहीसे जास्तच) पर्यटनाकरिता येतात. याउलट काही महिन्यांपूर्वी पुण्याला गेलो होतो, तेव्हा प्रभात रोडवरील आमच्या सोसायटीमध्ये आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सुंदर गुलमोहर फुलला होता. पण आपल्याकडे गुलमोहराभोवती साकुरासारखे काही वेगळे केले जात नाही. जपानमध्ये एखाद्या सुंदर गोष्टीकडे लोकांचे लक्ष कसे वेधायचे आणि त्याभोवती एक चांगला अनुभव कसा तयार करायचा, हे त्यांना छान जमते.