पु.लं.ना आतामी हॉटेलच्या खोलीतून समुद्र दिसतो, मग गरम पाण्याचा झरा, स्नान, किमोनो, जेवण, शामिसेन, साके आणि गाणी. त्यांचा अनुभव जणू एका पडद्यामागून दुसरा पडदा उघडत जाण्यासारखा आहे. आणि त्या अनुभवात त्यांना जपानी स्नानाचा धक्का बसतो. त्यांची विनोदबुद्धी लगेच कामाला लागते
“इथे नग्नतेची बंधनं फार ढिली आहेत. लाज, संकोच वगैरे भावना किमोनो, ओबी वगैरे चढवल्यानंतर सुरू होतात”
हे वाक्य वाचताना मला हसू येतं, त्यात एक अत्यंत अचूक cultural observation आहे. जपानमध्ये शरीराविषयीचा संकोच आणि सामाजिक शिष्टाचार यांची रचना भारतीय संस्कृतीपेक्षा वेगळी आहे. माझ्या स्वतःच्या अनुभवात या संस्कृतीचा अर्थ मला कंपनीच्या आतामी off-site मध्ये विशेष जाणवला. दिवसभर आम्ही जवळजवळ तीन तास कंपनीच्या प्रश्नांवर चर्चा करत होतो. व्यवसाय, निर्णय, जबाबदाऱ्या, पदं सगळं तिथे होतं. प्रत्येक जण आपल्या भूमिकेत होता.
पण त्यानंतर जेव्हा आम्ही सगळे ओनसेनमध्ये उतरलो, तेव्हा ती hierarchy जणू पाण्याबाहेरच राहिली. तिथे कोणी senior/junior नव्हतं, manager/subordinate नव्हता. आम्ही फक्त माणसं होतो. ओनसेनचा अनुभव मी कधीच टाळला नाही. उलट जपानमध्ये राहायला लागल्यापासून तो मला आवडतो. कारण माझ्यासाठी त्याचा अर्थ केवळ गरम पाण्यात शरीर विसावणं नाही. तो म्हणजे दिवसभर अंगावर चढवलेल्या आणि आपण स्वतःला चिकटवून घेतलेल्या अनावश्यक ओळखी थोड्या वेळासाठी काढून ठेवणं.
पु.लं.नी विनोदाने म्हटलं, “लाज संकोच वगैरे भावना किमोनो, ओबी वगैरे चढवल्यानंतर सुरू होतात” मला या अनुभवातून त्याचा एक वेगळा अर्थ जाणवतो: कधी कधी काही गोष्टी काढून ठेवल्यावर माणूस अधिक मोकळा होतो. आणि कदाचित म्हणूनच जपानी ओनसेनमध्ये मला सर्वांत जास्त जाणवणारी गोष्ट देहाविषयीचा संकोच नसून समानता आहे.
Atami Onsen at company offsite (Manish Prabhune)